सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय..? रायगडला श्रावणात भोलानाथ भरभरून बरसले

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय..? रायगडला श्रावणात भोलानाथ भरभरून बरसले…महाडची सावित्री, रोह्याची कुंडलिका धोका पातळीच्या वर ; शाळांना सुट्टी जाहीर
सहार-समय,मराठी
ब्युरो टीम
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? शाळे भोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? चार-पाच दशकपूर्वी ही कविता मुलांना अतिवृष्टीचा इशारा नव्हे, पावसात आनंद देणारी सुसंधी असायची.
दोन-तीन दिवस रायगडला श्रावणाच्या सलामीला भोलानाथ भरभरून बरसले…महाडची सावित्री, रोह्याची कुंडलिका धोका पातळीच्या वर गेली. जिल्ह्यातील काही शाळांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे .
जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले.शालेय विद्यार्थ्यां बाबतीत कोणताही धोका घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने शनिवार, दिनांक 26 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महाड शहरासह परिसरातील पोलादपूर व महाबळेश्वर येथील पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती नगरपरिषदेच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सकाळी सहाच्या सुमारास नगरपरिषदेने सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली,महिकावती मंदिराच्या इथे असलेल्या पातळीनुसार पाणी 6पूर्णांक 15 दशांश झाले आहे. शहरात पाणी शिरायला केवळ सावित्री नदीच्या शेवटच्या पायऱ्या शिल्लक राहिल्या आहेत.
गेल्या 48 तासांपासून या दोन्ही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. जागोजागी पाणी साचले आहे. काही सखल भागांमध्ये पाणी घरात शिरल्याचेही वृत्त आहे. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली, पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसू लागल्याने रायगड प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णया मुळे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी राहता येईल.त्यामुळे पालकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.सध्या तरी इतर तालुक्यांमधील शाळांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र हवामानाचा अंदाज आणि परिस्थिती पाहून पुढील सूचना दिल्या जातील, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मागील 24 तासात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आगामी दोन दिवस जिल्हा प्रशासनाने मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज इशारा दिला असून संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश रात्री उशिरा दिले आहेत. महाड शहरात दस्तुरी नाका, गांधारी नाका, या ठिकाणी पुराचे पाणी साचण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले.
सखल भागात राहणाऱ्या महाडकर नागरिकांनी तसेच नदी लगतच्या भागातील ग्रामीण भागातील नागरिकांनी संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित स्थळी जावे असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
स्थानिक प्रशासन कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती महाड आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून देण्यात आली. शहराच्या हद्दीतील तीन ठिकाणी होड्या व बचाव पथकांची व्यवस्था नगर परिषदेने यापूर्वीच केली आहे. एकूणच आगामी 24 तास महाडकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून 26 जुलै रोजी वीस वर्षांपूर्वी दासगाव येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा आज स्मृतिदिन आहे.महाडच्या पुल दुर्घटनेला देखील अजूनही आठवले जाते.
दरम्यान रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीचा आज सकाळी ७ वाजता घेण्यात आलेला अहवाल जाहीर झाला आहे. यामध्ये सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली असून ती धोक्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे, तर कुंडलिका नदी इशारा पातळी इतकी असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या महाड येथील सावित्री नदीची पाणी पातळी ६.४५ मीटरवर पोहोचली आहे. या नदीची इशारा पातळी ६.०० मीटर आहे, तर धोका पातळी ६.५० मीटर आहे. त्यामुळे सावित्री नदी धोक्याच्या पातळीपासून अवघी ०.०५ मीटर दूर असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीची (डोलवहाल बंधारा) पाणी पातळी २३.०० मीटर इतकी नोंदवली गेली आहे, जी तिची इशारा पातळी आहे. या नदीची धोका पातळी २३.९५ मीटर आहे. त्यामुळे कुंडलिका नदीच्या परिसरातील नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी.असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

