कबुतर खाना प्रश्नावर जैन महासंघाची अभ्यासाची नवी रणनीती

कबुतर खाना प्रश्नावर जैन महासंघाची अभ्यासाची नवी रणनीती
सहारा-समय, मराठी
ब्युरो चीफ
जैन महासंघाची अभ्यास समिती कबुतरखान्या संदर्भात कायदेशीर बाब तपासणार आहे. त्या सोबतच वैद्यकीय बाजूंचा तसेच पर्यावरणाचा ही अभ्यास समिती करणार आहे.
समिती कडुन लोकांच्या आजारांच्या रिपोर्टचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर अहवाल न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या समितीला सादर करेल. ही समिती 20 सदस्यांची असेल, असे जैन महासंघाच्या बैठकीत ठरले. या बैठकीसाठी मुंबईतील प्रतिनिधींसह 12 राज्यांतील जैन महासंघाचे प्रमुख उपस्थित होते.
कबुतरांमुळे नक्की कोणते आजार होतात? त्यांचे स्वरुप कसे असते? परदेशात कबुतरखान्या संदर्भात कोणती काळजी घेतली जाते ? कबुतरखाने इतरत्र हलवावे लागले तर कोणती उपाययोजना करावी लागेल? मानवी आरोग्यावर परिणाम होणार नाही आणि कबुतरांचा जीव जाणार नाही, याची कशी सांगड घालता येईल? आदी अनेक बाबींचा अभ्यास जैन समाजाची समिती करणार आहे, असे अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेने कबुतरांना कुठलेही खाद्य टाकण्यास मनाई करत कबुतरखान्यावर ताडपत्री टाकली होती. मात्र, जैन समाजाने आक्रमक होत 6 ऑगस्ट रोजी चाकू-सुऱ्यांनी ताडपत्री काढून टाकली होती. त्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. जी. एस. कुलकर्णी आणि न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने कबुतरांना धान्य टाकण्यावरील बंदी कायम ठेवली. या संदर्भात झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्यास सांगितले. या समितीतील तज्ज्ञांच्या अहवालानंतर न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे.
या समितीकडे जैन समाजाला त्यांचे म्हणणे मांडता यावे, यासाठी जैन महासंघाने स्वत: कायदेतज्ज्ञ, वैद्यकीय जाणकारांची तसेच जैन समाजातील काही प्रतिष्ठित मंडळींची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.अशी माहिती अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
कबुतरखाना बंद करण्यावर मुंबई उच्च न्यायालय ठाम राहिल्याने जैन समाज काहीसा मवाळ झाला आहे. आता याबाबत कायदेशीर आणि वैद्यकीय बाबींचा अभ्यास करण्याचा निर्णय जैन महासंघाने घेतला आहे. त्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात येणार आहे. या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी जैन महासंघाची 13 ऑगस्ट रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली होती.


